॥ श्री पद्मावती देवी प्रसन्न ॥

श्री क्षेत्र पद्मावती देवीचा इतिहास

अहिल्यानगरमधील घोसपुरी या ठिकाणी माहूरगड निवासिनी रेणुका मातेचे स्थान असून पद्मावती देवी मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. जागृत व नवसाला पावणारी, अशी येथील देवीची ख्याती असल्याने हजारो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या आतील भिंती व खांबांना सगळीकडे काचेच्या विविधरंगी लहान-लहान तुकड्यांची वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली असल्याने परिसरात ते 'काच मंदिर' म्हणूनही प्रसिद्ध आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की येथून श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावातील जठार घराण्यातील एक रेणुका मातेचा भक्त दरवर्षी माहूरगडावर देवीच्या दर्शनाला जात असे. लग्नाला अनेक दिवस होऊनही त्याला अपत्य नव्हते, म्हणून त्याने माहूरच्या देवीला साकडे घातले. त्याच रात्री देवीने स्वप्नदृष्टात येऊन पहाटे त्याला शेतात जाण्यास सांगितले. देवीने सांगितल्याप्रमाणे शेतात पोहचताच त्याच्या कानावर लहान बालकाचे रडणे पडले. आवाजाच्या दिशेने तो गेला असता एका तरवडाच्या झाडाखाली नुकतीच जन्मलेली मुलगी दिसली.

त्याने तिला उचलून घरी आणले, या दाम्पत्याने तिचे नाव पद्मावती ठेऊन पालनपोषण केले. जगदंबेच्या कृपेने मिळालेली मुलगी म्हणून लोक तिला 'अंबिका' असेही म्हणत.

काही वर्षांनी अंबिका उपवर झाली. तिचे लग्न करावे असे तिच्या आई - वडिलांना वाटू लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछत्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकाचा विवाह ठरवला. योग्य वेळी तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावू - येवू लागली. दरंदल्यांचा शेतीचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकऱ्यांना इरजीकीचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकाला न्याहारीसाठी स्वयंपाक करावयास सांगितले. अंबिकाने स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले.

सासरे भाकरी नेण्यासाठी शेतावरून घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरून ठेवले होते. सासऱ्याने टोपले उचलून शेतावर नेले. न्याहारीची वेळ झाली होती. शेतकऱ्यांना त्यांनी न्याहारीसाठी हाक मारली. टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहून सासऱ्यास विचार पडला, हे जेवण सर्वांना कसे पुरणार? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की, थोडी थोडी भाकरी खावूया, तसे सासऱ्याने जेवण वाढण्यास सुरुवात केली. जेवढ्या भाकरी टोपल्यातून उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसू लागल्या. कालवणही तेवढेच दिसू लागले. सर्वांची पोटभर जेवणे झाली, तरी टोपल्यातील पाच भाकरी आणि शेडगातील कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्य चकित झाले. ही वार्ता हा हा म्हणता संपूर्ण रुई गावात पसरली.

अंबिकेच्या सासूला ही बातमी समजली. ती अतिशय नाराज झाली. तिला वाटले की ही कोणीतरी चेटकीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही, असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच अंबिकेला माहेरी पाठविण्याची तयारी सुरू झाली. सुनबाईंना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासऱ्याची नेमणूक झाली, त्याकाळी कुठल्याही प्रकारचे वाहने नव्हती. त्याच्या घरी एक सुंदरशी घोडी होती. ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरू झाला. विसापूरच्या अलीकडे नगर तालुक्यात घोसपुरी नावाचे गाव आहे.

तिथपर्यंत येथे दुपार झाली होती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावाजवळ एका विहिरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. या विहिरीवर पाणी काढण्यासाठी काही साधन नव्हते. त्यामुळे त्यांनी थोडे पुढे जाऊन नदीच्या कडेला असलेल्या झऱ्यावर ते दोघे पाणी प्याले.

तेथील निसर्गरम्य परिसर पाहून अंबिकाचे मन तेथे रमले. ती काहीतरी कारण सांगून सासऱ्यापासून थोडी दूर अंतरावर गेली. अंगावरील सर्व डागदागिने झऱ्याजवळ दगडाखाली ठेवून ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला तरी ती न आल्याने तिच्या सासऱ्याने तिला हाका मारण्यास सुरुवात केली. तेव्हा गावापासून पूर्वेला २ कि. मी. अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावर 'जी' असा आवाज ऐकू येवू लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसून टेंभी डोंगरावर गेला. तेथे हाक मारली असता गुप्त झालेल्या ठिकाणी आवाज आला. पुन्हा तेथे आले तर आवाज डोंगरावर आला. असे बऱ्याचदा झाले. पण अंबिका काही दिसेना.

हेलपाटे मारून मारून घोडी व तिच्या सोबत असलेले शिंगरू थकले. ते टेंभी डोंगरावर थबकले. तेथे पाषाणात त्यांची पावले उमटली. ती आजही तेथे पहावयास मिळतात.

हेलपाटे मारून मारून अंबिकेचे सासरे घोडी व शिंगरू घेवून ती गुप्त झाली त्या ठिकाणी आले. अंबिका सापडेना आता घरी व तिच्या माहेरी काय सांगायचे या विचाराने चिंताग्रस्त होवून त्यांनी तेथेच देह ठेवला. आपला मालक निश्चिंत पडलेला पाहून घोडी व शिंगरू यांनीही त्याच्या देहाभोवती गोल फेऱ्या मारत मारत आपला देह ठेवला.

दुसऱ्या दिवशी अंबिका सासूच्या स्वप्नात गेली व तिने ज्या ठिकाणी गुप्त झाले त्या ठिकाणची सर्व माहिती दृष्टांताद्वारे सांगितली. दरंदले कुटुंबातील लोकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे त्यांना डागदागिने व एक तांदळा सापडली. घोसपुरी येथील ग्रामस्थांनी दागिने दरंदले कुटुंबाकडे दिले. व तांदळा सापडली तेथे सुंदर असे मंदिर बांधले. मंदिराबाहेरच देवीचे सासरे व घोडी आणि शिंगरू यांची समाधीही बांधली. तेव्हा पासून ही पद्मावती देवी घोसपुरीसह परिसरातील गावांचे श्रद्धास्थान झाले.